सोनावळेतील गणेश लेणी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ‘सोनावळे’ गावाजवळ प्राचीन गणेश लेणी अथवा ‘गणेश गडद’ या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.

इसवी सन १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. ‘गणेश लेणी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दगडी गुहेत विविध दालने आहेत. त्यात हिंदू देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा फार मनमोहक असतो.

पूर्वी हे पर्यटनस्थळ दुर्लक्षित होते; मात्र आता वन विभाग आणि सोनावळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लेण्यांमध्ये नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. सौर पथदिवे बसवून इथल्या दालनांमध्ये रात्री मुक्काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे.

ग्रामस्थ आणि वन विभागाने लेण्यांकडे जाणारी पायवाट दुरूस्त केली आहे. कठीण चढ काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांची इथे सुलभ सोय झाली आहे. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामस्थांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला जात आहे. पर्यटक आणि ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेऊन याठिकाणी अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

पाणी, वीज, चांगले रस्ते या सोयींमुळे आता ‘गणेश लेणी’ परिसरात पर्यटक येतात. वाटेत जैवविविधतेने श्रीमंत झालेले जंगल आहे. येथे अनेक दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरे आहेत. त्यातून सोनावळे ग्रामस्थांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.






209 वेळा पाहिलं