
महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्याचा अधिकृत ‘राज्योत्सव’ म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विधानसभेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे गणेशोत्सवाला आता शासकीय स्तरावर मान्यता व पाठबळ मिळणार आहे.
आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक ओळखीचा गाभा आहे. त्यामुळे याला फक्त धार्मिक नव्हे, तर सार्वजनिक सांस्कृतिक महत्त्व आहे.” यापुढे हा उत्सव राज्य पुरस्कृत कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे.
या घोषणेसोबतच सरकारने प्रशासकीय व आर्थिक मदतीचे आश्वासनही दिले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी आवश्यकतेनुसार निधी, परवानग्या आणि सुविधा दिल्या जातील. शेलार यांनी स्पष्ट केले की, “सरकार हा उत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
शेलार यांनी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा विशेष उल्लेख केला. “ही परंपरा फक्त उत्सव नसून एक सामाजिक संघटन आणि लोकशिक्षणाचं साधन आहे,” असे ते म्हणाले. तसेच पर्यावरणपूरक उत्सवासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सवाला अधिकृत ‘राज्योत्सव’ म्हणून घोषित केल्याने, हा निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला अधिक बळकटी देणारा ठरणार आहे. नागरिकांमध्येही या घोषणेमुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.