गिझर निर्मिती उद्योग

प्राचीन काळी पाणी गरम करण्यासाठी नैसर्गिक इंधने वापरली जात होती. विशेषतः लाकडाचा वापर सर्वाधिक होत असे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने देशातील बहुतांश लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. लाकडासह शेणखत, भाताची ताडे, चिपाड अशी कृषी उत्पादने वापरली जात होती. नंतर घासलेटचे स्टोव्ह आले. आज रेशन दुकानातून घासलेटही जवळपास मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. खुल्या बाजारातून घासलेटची खरेदी करणे खूप महाग आहे. या कारणास्तव स्टोव्हवर पाणी गरम करणे देखील भूतकाळातील गोष्ट बनली आहे.
आधुनिक काळात इंधन म्हणून गॅसचा सर्वाधिक वापर केला जात आहे. शहरांमध्ये गॅस वापरण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शहरांतील घरे सिमेंट-काँक्रीटची आहेत. इथे स्टोव्ह पेटवणे शक्य नाही. धुरामुळे घर काळे होत नाही किंवा आजूबाजूच्या लोकांना धुरामुळे कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे शहरात धूर होणारे इंधन बहुधा उपयोगाचे नाही. फ्लॅट आणि अपार्टमेंट संस्कृतीमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा असतात. प्रदूषण करणारे इंधन अजिबात वापरले जात नाही. म्हणून गॅसचा सर्वाधिक वापर केला जातो. नैसर्गिक वायूच्या मर्यादित साठ्यामुळे ते लवकर किंवा उशिरा संपणार आहेत. तसेच मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्याने गॅसचा काळा बाजार होतो. सरकारकडून मिळणारे अनुदानही कमी होत आहे. महागाईमुळे गॅस उत्पादक कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढल्याने दर 4 ते 6 महिन्यांनी गॅसचे दर वाढत आहेत.
गॅस सिलिंडर खरेदी करणे काही दिवसांत सर्वसामान्यांच्या क्षमतेबाहेरचे होणार असून त्यासाठी काही तरी पर्याय शोधावा लागेल. घरगुती गॅसचा वापर कमी करण्याकरिता घरातील लोकांना आंघोळीसाठी दररोज लागणारे पाणी गरम करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या गिझरचा वापर हा चांगला पर्याय आहे.
विजेवर चालणारे हे उपकरण घरातील सर्व लोकांना गॅसपेक्षा कमी खर्चात गरम पाणी पुरवू शकते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी गिझरचा वापर हा करावा लागणार आहे.
गिझर निर्मिती करताना कुटुंबाच्या गरजेनुसार 20 ते 50 लिटरचा गिझर तयार करून त्याच्या मध्यभागी एक हीटर बसवला जातो. गिझरमध्ये एका पाईपमधून थंड पाणी आत जाते आणि दुसऱ्या पाईपमधून गरम पाणी बाहेर येते. गिझर तयार करणे आणि वापरणे या दोन्ही गोष्टी कुशलतेने कराव्या लागतात.
गिझर हे विजेवर चालणारे उपकरण असल्याने ते तयार करताना किंवा निष्काळजीपणे वापरताना मानवी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. प्रस्तुत उत्पादन तयार करताना, आयएसआय मानांकन प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे पात्रता पत्र प्रमाणित केल्यानंतर हा उद्योग करता येऊ शकतो. विजेवर चालणारे गिझर तयार करण्याचे संपूर्ण काम अनुभवी आणि पदवीधर विद्युत अभियंत्याकडून करून घ्यावे. उत्पादन विभागात अशा कुशल कामगारांची नियुक्ती करावी. विद्युत अभियंते गिझर तयार करण्याचे थेट काम आणि सूत्र देऊ शकतात. उत्पादन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अशा तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी.
प्रत्येक घराला विजेवर चालणाऱ्या गिझरची आवश्यकता असल्याने, सर्व किरकोळ आणि घाऊक दुकाने विजेवर चालणारी उपकरणे विक्रीसाठी ठेवतात. हॉटेल, निवासस्थान, वसतिगृहे, रुग्णालये, धर्मशाळा यांना गिझरची नितांत गरज असते. त्यांच्या प्रमुखांना भेटून त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट आकाराचे गिझर तयार करून दिले जाऊ शकतात. घरोघरी केलेले विपणनसुद्धा फायदेशीर ठरते. या उद्योगासाठी तांबे-शिट पत्रा, एम.एस. शिट, हीटर, ग्लासवूल, व्हायलेट कॅम्प, बी.एस. पाईप्स, थर्मोस्टॅट्स, ओले पाईप्स इत्यादी कच्चा माल आवश्यक असतो. तसेच या उद्योगात यंत्रसामग्रीसह रोलिंग मशीन, गॅस वेल्डिंग मशीन, स्पिनिंग लेथ मशीन, स्प्रे-पेंटिंग पंप, इलेक्ट्रिक प्रेशर गेज इत्यादी, विजेवर चालणारी उपकरणे आणि साधने गरजेची असतात.