गोदावरी नदीला मिळणार सांडपाण्यापासून मुक्ती
नाशिकमध्ये २०२७मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे काम नाशिक महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकहजार एकशे चाळीस कोटी रुपयांच्या मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नाशिक शहरात नवीन मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्यात येईल. यामध्ये २०५५ पर्यंतची लोकसंख्या आणि सांडपाण्याची गरज लक्षात घेतली गेली आहे. शहरातील अस्तित्वातील दोन हजार पन्नास किलोमीटर लांबीच्या मलवाहिकांचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. अलमण्डस या सल्लागार कंपनीमार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. या कंपनीने नाशिक महानगरपालिकेला एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा सादर केला आहे. नोव्हेंबरअखेर सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे.
नदीपात्रात थेट सोडण्यात येणारे सांडपाणी मलनिःसारण केंद्रांकडे वळवले जाईल. जुनाट झालेल्या मलवाहिका बदलून त्यांच्या जागी अधिक क्षमतेच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. नव्याने विकसित झालेल्या भागातही मलवाहिकांचे जाळे विकसित केले जाईल.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर एक हजार चारशे कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची अंमलबजावणीही सुरू आहे. नवीन मलवाहिका टाकण्याची कामे अमृत दोन योजनेतून दोनशे सत्तावीस कोटी रुपये आणि सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या हरित प्रकल्प निधीमधून दोनशे पंचवीस कोटी रुपये टप्प्याटप्प्याने हाती घेतली जात आहेत. उर्वरित सातशे कोटी रुपयांच्या कामांसाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत.
यामुळे गोदावरी नदी प्रदुषणमुक्त राहील आणि कुंभमेळ्याच्या भाविकांना देखील शाही स्नानासाठी सुलभता होईल.