शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचा संप सुरूच

राज्यातील शासकीय रुग्णालयांतील परिचारिका गेल्या पाच दिवसांपासून संपावर असून, आपली विविध प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र आंदोलन करत असतानाही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आंदोलनस्थळीच रक्तदान करून अनोखा आदर्श ठेवला आहे.
या परिचारिकांच्या मुख्य मागण्या म्हणजे — रिक्त पदांवरील भरती तत्काळ करणे, सेवा शर्तींचा पुनर्विचार, वाढीव कामाचा मोबदला मिळवणे आणि वेतनातील तफावत दूर करणे. अनेक वेळा लेखी आश्वासने दिली गेली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा परिचारिकांचा आरोप आहे.
मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम, सायन आणि नायरसह राज्यभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमधील परिचारिका संपात सहभागी आहेत. रुग्णसेवा कोलमडू नये म्हणून अत्यावश्यक सेवा भागवत काही कर्मचारी कामावर आहेत, मात्र बहुसंख्येने परिचारिका आंदोलनात सहभागी आहेत.
विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी परिचारिकांनी आंदोलनस्थळीच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. “आमचं आंदोलन रुग्णांच्या विरोधात नाही, तर सेवेशी अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरोधात आहे,” असा संदेश त्यांनी दिला आहे.
शासकीय पातळीवर चर्चेचे प्रयत्न सुरू असले तरी तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत योग्य निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे.