माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासनसेवा नागरिकांच्या दारी
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांचा सुलभ लाभ मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील प्रत्येक सेवा केंद्र हे नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक व्हावे, अशी अपेक्षा माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली. ते मुंबई उपनगर जिल्ह्यातील सेवा केंद्र वितरण कार्यक्रमात बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे आणि सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, आज माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात सायबर धोकेही वाढले आहेत. महाराष्ट्राचा सायबर सुरक्षा विभाग सक्षम असला तरी प्रत्येक सेवा केंद्राने जबाबदारीने काम करून नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवावी, अशी सूचना त्यांनी दिली. तंत्रज्ञानाचा वापर करताना दक्षता बाळगणे आवश्यक असून, नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे हीच या योजनेची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2018 मध्ये जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक सेवा केंद्र असायचे. मात्र आता ती संख्या वाढवून दोन केंद्रे करण्यात आली आहेत. या माध्यमातून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, अधिवास, नॉन-क्रीमीलेअर, उत्पन्न दाखला आदी हजाराहून अधिक सेवांचा लाभ त्यांच्या परिसरातच मिळतो. शासन कार्यालयात वारंवार फेऱ्या न मारता नागरिकांना त्यांच्या भागातच सर्व सेवा मिळाव्यात, हा या योजनेचा प्रमुख हेतू असल्याचे शेलार यांनी सांगितले.
मंत्री शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन लवकरच सेवा केंद्रांच्या ब्रँडिंगसाठी व्यावसायिक संस्थेशी करार करणार असून, या माध्यमातून सेवा केंद्रांच्या कामकाजात एकसंधता आणि व्यावसायिकता आणली जाणार आहे. या कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्यातील दोनशे अडतीस सेवा केंद्रांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यापैकी सात दिव्यांग व्यक्ती तसेच एका तृतीयपंथीयाचाही सहभाग आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा सुरू आहेत. व्हॉट्सअॅपद्वारे प्रमाणपत्र पाठविणे, अर्ज प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सर्व सेवा तसेच आधार केंद्रांचे जिओ-टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळचे केंद्र गुगल नकाशा आणि चॅटबॉटच्या सहाय्याने सहज शोधता येते. त्यांनी पुढे सांगितले की, तहसील कार्यालयातील सेतू केंद्रांचे आधुनिकीकरण सुरू असून, पासपोर्ट कार्यालयाप्रमाणेच सुसज्ज सेवा नागरिकांना मिळणार आहेत. अंधेरी तालुक्यात चौपन्न, बोरीवली तालुक्यात सदुसष्ठ आणि कुर्ला तालुक्यात एकशे सतरा सेवा केंद्रांचा समावेश आहे.