करमाळा तालुक्यातील सिंचन समस्येवर शासनाकडून उपाययोजना सुरू
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी नियोजनबद्ध पद्धतीने मिळावे यासाठी कुकडी कालव्याची दुरुस्ती आणि माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी सोडण्यासाठी जलबोगदा उभारणीची योजना हाती घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत रिठेवाडी उपसा सिंचन योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे प्रमुख उपस्थित होते. तसेच आमदार नारायण आबा पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, सहसचिव अलका आहेरराव, मुख्य अभियंता चोपडे, तसेच लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विखे पाटील म्हणाले की, “कुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती केल्यास पाण्याची उपलब्धता वाढेल व गळती कमी होईल. माणिकडोह धरणात अधिक पाणी आणण्यासाठी जलबोगदा प्रकल्पावर काम सुरू आहे. तसेच कुकडी कालव्याद्वारे करमाळा परिसरातील बंधाऱ्यांमध्ये आणि धरणांमध्ये पाणी साठवले जाईल.”
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी अपुरे असल्याने जलनियोजनानुसार पाच पूर्ण अठ्ठावीस टीएमसी पाणी उपलब्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत. उजनी धरणातील पाणी वाटप नियोजन निश्चित झाले असल्याने डिंभे धरणातून माणिकडोह धरणात पाणी आणण्याचा पर्याय, तसेच इतर पर्यायांचा विचार करून पंचेचाळीस दिवसांत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील, तसेच सरपंच अंकुश शिंदे, मदन पाटील आणि रश्मी बागल यांनी आपली मते मांडली. करमाळा तालुक्यातील तेवीस हजार सातशे चार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंपदा विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. तसेच वॉपकॉस संस्थेच्या अहवालाच्या आधारे नियोजन अंतिम करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.