आधारकार्ड अपडेटवर सरकारचा नवा नियम

आधारकार्ड हे नागरिकांच्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. सरकारी योजना, बँक व्यवहार किंवा अन्य अधिकृत कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. अशा स्थितीत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधारशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. या निर्णयानुसार आधारकार्ड अपडेट करण्याच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

पूर्वी आधारकार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल क्रमांक यांसारखी माहिती बदलण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता हे शुल्क वाढवून पंचाहत्तर रुपये करण्यात आले आहे. तसेच बायोमेट्रिक माहिती — म्हणजेच बोटांचे ठसे, डोळ्यांची पडदे किंवा छायाचित्र बदलण्यासाठीचे शुल्क शंभर रुपयांवरून वाढवून एकशे पंचवीस रुपये करण्यात आले आहे. तांत्रिक खर्च वाढल्यामुळे शुल्क वाढविण्यात आल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

तथापि, सात ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी यूआयडीएआयने दिलासा दिला आहे. या मुलांसाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांची पडदे अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. पूर्वी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारले जात होते. मुलांचे जैविक तपशील वयानुसार बदलत असल्याने हे अपडेट मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुलै दोन हजार पंचवीस मध्ये यूआयडीएआयने आधार अपडेट आणि नवीन आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची नवीन यादी जाहीर केली. या यादीत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय, ओसीआय कार्डधारक आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी समान नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच आधार क्रमांक असावा; दोन क्रमांक असल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असेही यूआयडीएआयने स्पष्ट केले.

दरम्यान, मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 रोजी संपली आहे. त्यामुळे आता कोणतेही बदल करायचे असल्यास नागरिकांना निश्चित शुल्क भरावे लागेल. काही तज्ञांच्या मते, मोफत अपडेट सुविधा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.






6,728 वेळा पाहिलं