
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य’ या योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानातून नाशिकच्या रामकुंड परिसरातील ऐतिहासिक रामकाल पथ उभारणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे पौराणिक वारसा जपण्यासह परिसराचे सुशोभीकरण होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामकाल पथाच्या संकल्पचित्रांचा अभ्यास करून प्रकल्पातील नियोजन, रचना आणि कामकाजाची माहिती जाणून घेतली. या प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्गाचे संवर्धन, दर्शनी भागांचे सौंदर्यीकरण, तटबंदीचा जीर्णोद्धार आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. सीता गुंफा, काळाराम मंदिर, राम-लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक स्थळांचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा अधिक प्रभावीपणे जतन होण्यास मदत होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसराचे सांस्कृतिक महत्त्व व्यापकपणे अधोरेखित करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, केंद्र सरकारच्या साहाय्याने रामकाल पथ उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांना येथे सुखद, सुव्यवस्थित आणि आध्यात्मिक अनुभव मिळावा, यासाठी या प्रकल्पाचे विशेष महत्त्व आहे.
या प्रकल्पामुळे पवित्र गोदावरी किनाऱ्याला नवे सौंदर्य लाभणार असून परिसराचा पौराणिक इतिहास आणि आध्यात्मिक परंपरा भाविकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. भविष्यातील कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या प्रकल्पामुळे सुटसुटीत मार्गदर्शन, सुरक्षित परिसर आणि सुधारित सुविधा उपलब्ध होतील.
रामकाल पथाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. मंदिर विश्वस्तांनी यावेळी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. या संपूर्ण प्रकल्पामुळे नाशिकचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा नव्या रूपात उजळून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.