मध्य रेल्वे स्थानकांवर आरोग्य सेवा ठप्प

मुंबई महानगरात दररोज लाखो प्रवासी लोकल रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. या प्रवाशांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी रेल्वे प्रशासनाने अपात्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेमधील वैद्यकीय सुविधांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे चित्र समोर आले आहे.
चर्चगेट, दादर, अंधेरी, बोरीवली, वसई आणि विरार या प्रमुख स्थानकांवर चोवीस तास कार्यरत असणारे प्राथमिक उपचार कक्ष आहेत. या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस, आणि काही ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. प्रवाशांना अचानक त्रास झाल्यास किंवा अपघात झाल्यास त्वरित प्राथमिक उपचार दिले जातात. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते.
याच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील महत्त्वाची स्थानके – सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण – येथे ना उपचार कक्ष, ना डॉक्टर, ना रुग्णवाहिका. अपघात झाल्यास प्रवाशांच्या मदतीला कोणीही नसते. काही वेळा स्थानिक नागरिक, पोलीस किंवा समाजसेवक पुढे येतात आणि जखमी प्रवाशाला रुग्णालयात पोहचवतात.
रेल्वेच्या नियमानुसार, प्रत्येक प्रमुख स्थानकावर प्राथमिक वैद्यकीय केंद्र असणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम केवळ कागदावरच राहिले आहेत. मध्य रेल्वेवर याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गंभीर अपघातानंतर अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मध्य रेल्वे प्रशासनाने याआधीही अशा सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात कोणतीही सुविधा सुरू झालेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात असलेली ही दुर्लक्ष वृत्ती चिंताजनक आहे.
प्रवासी संघटनांनी केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे की, पश्चिम व मध्य रेल्वेमध्ये भेदभाव न करता सर्व प्रमुख स्थानकांवर समान आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्राथमिक उपचार केंद्र, प्रशिक्षित कर्मचारी आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था ही प्रत्येक प्रवाशाचा मूलभूत अधिकार आहे.
मुंबईसारख्या प्रगत शहरात, जिथे दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, तिथे अपात्कालीन वैद्यकीय सेवांचा अभाव हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अपघात टाळता येत नसले, तरी वेळेवर उपचार मिळाले, तर जीव वाचू शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता, त्वरित कृती करून प्रवाशांचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे.