देशभरात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा – नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

भारतीय हवामान विभागाने देशभरात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांत सक्रिय असलेले ‘मोथा’ चक्रीवादळ आता हळूहळू कमजोर होत असले तरी त्याच्या परिणामस्वरूप पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस, तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांतील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. या प्रदेशातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि पूरप्रवण भागात खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशासह तमिळनाडू, केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या भागांतील किनारी जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान विभागाने सांगितले की, राजस्थान आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, अधूनमधून पावसाचे सरी दिसतील. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील. विशेषतः कोकण किनारा, विदर्भ आणि मराठवाडा विभागात हवामान ढगाळ राहून, अल्प प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहिल्याने देशभरातील हवामानात चढ-उतार दिसतील, आणि नोव्हेंबरच्या प्रारंभी काही भागांमध्ये हिवाळ्याच्या आगमनाआधीचा अवकाळी पावसाचा टप्पा अनुभवता येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.






18,408 वेळा पाहिलं