
रायगड जिल्ह्यात सोमवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मात्र, अशा स्थितीतही विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्यासाठी घर सोडलं आणि मगच प्रशासनाने काही तालुक्यांमध्ये सुट्टी जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही अडचणीत सापडले.
जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. परंतु, हा निर्णय सकाळी उशिरा जाहीर झाल्यामुळे बहुतेक विद्यार्थी शाळेत पोहोचल्यावरच त्यांना सुट्टीची माहिती मिळाली. काही विद्यार्थ्यांना जोरदार पावसात भिजतच शाळेत जावं लागलं, तर काहींना परतीच्या मार्गावर वाहनांचीही गैरसोय भोगावी लागली.
या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका पालकांनी सांगितले, “जर प्रशासनाने पावसाचा अंदाज लक्षात घेऊन रात्रीच निर्णय घेतला असता, तर आमच्या मुलांना या त्रासातून वाचवता आलं असतं. पहाटेपर्यंतही कुठलीही स्पष्ट माहिती मिळाली नाही.”
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्वरित आणि योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. हवामान खात्याने आधीच पावसाचा इशारा दिला होता, हेही नागरिकांनी अधोरेखित केलं. प्रशासनाकडून यापुढे अशा परिस्थितीत वेळीच निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, पालक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.