
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारसह विविध राज्यांनी सावधगिरीचे पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने तेलंगणा सरकारने दिल्लीत एक विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे, जेणेकरून तातडीच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना मदत पोहोचवता येईल.
या हेल्पलाइनच्या माध्यमातून दिल्ली किंवा अन्य भागांत असलेल्या तेलंगणा राज्यातील व्यक्तींना त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी, मदतीची विनंती करण्यासाठी अथवा आपत्कालीन माहिती मिळवण्यासाठी सहज सुविधा उपलब्ध होणार आहे.
हेल्पलाइन नंबर :
वंदना (निवासी आयुक्त): +९१९८७१९९९०४४
जी. रक्षित नायक (संपर्क अधिकारी): +९१९६४३७२३१५७
जावेद हुसेन (संपर्क अधिकारी): +९१९९१००१४७४
सी.एच. चक्रवर्ती (जनसंपर्क अधिकारी): +९१९९४९३५१२७०
तेलंगणा सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या नागरिकांची माहिती नोंदवून संबंधित यंत्रणांमार्फत त्वरित मदत पोहोचवली जाणार आहे. तसेच दिल्लीतील तेलंगणा भवन आणि राज्य सरकारचा दिल्लीतील प्रतिनिधी कार्यालय यांच्यात समन्वय साधून ही मदत प्रभावीपणे राबवली जाईल.
तेलंगणा सरकारने या संकटाच्या काळात “राज्याच्या कोणत्याही नागरिकास अडचण भासल्यास आमच्याशी तातडीने संपर्क साधावा” असे आवाहन केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या अधिकृत सूत्रांशीच संपर्क साधावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे संकटात असलेल्या राज्यातील नागरिकांना धीर मिळेल आणि गरज पडल्यास तातडीने मदत पोहोचवता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.