हिमायत बाग

छत्रपती संभाजीनगरच्या रौजा बाग परिसरात दिल्ली गेटजवळ हिमायत बाग हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ही बाग १७ व्या शतकातील असून 300 एकर परिसरात पसरलेली आहे. येथे आता फळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका असून ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा एक भाग आहे. पूर्वी या बागेची ओळख ‘मुघल गार्डन’ अशी केली जाई. औरंगजेबाच्या दरबारातील एका अधिकाऱ्याने हिमायत बाग विकसित केली. या बागेत विविध जातींची अनेक फळझाडे होती.

हिमायत बागेत इवाझ खानने उभारलेली बारा दरी देखील आहे. येथे आच्छादित जलवाहिनी एका इमारतीवरून जाते. हे पाणी खाली अनेक कारंजे असलेल्या आयताकृती कुंडात उतरते. हे अभियांत्रिकीचे एक अद्भुत उदाहरण आहे. बारा दरीमध्ये आता फळसंशोधन केंद्राचे कार्यालय आहे. येथील ‘समर पॅलेस’ हा राजवाडा दुर्मिळ असून अर्धा भूमिगत आहे. या अष्टकोनी महालाच्या सर्व बाजूंनी वाहणारे पाणी बाहेरील तापमानापेक्षा किमान 5 अंश थंड ठेवते.
हिमायत बाग ही पर्यटकांसाठीचे आकर्षण आहे. पर्यटक येथे विविध झाडे पाहू शकतात. या बागेत पर्यटक विविध प्रकारची कलमी रोपे खरेदी करु शकतात. येथे चिंच, आंबा अशी अनेक वनस्पतींची रोपे मिळतात. पर्यटक या बागेस आवर्जून भेट देतात.