नाशिकमधील हवामानातील बदलांमुळे द्राक्ष बागायतदार संकटात
नाशिकमध्ये हवामानाच्या बदलांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. गेले काही दिवस काही भागांत निर्माण झालेले ढगाळ वातावरण, कडक ऊन आणि अचानक कमी होणारे तापमान असे हवामान बदल अनुभवायला मिळत आहे. यामुळे द्राक्ष पिकाला मणी तडकणे या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या बागांमध्ये हा धोका अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
प्रामुख्याने नाशिक, सांगली, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील द्राक्ष बागांवर वातावरण बदलाचा परिणाम दिसून येत आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत निर्माण झाल्यास द्राक्षांच्या मण्यांच्या सालीवर ताण येतो. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या वेळी दव पडते. मण्यांच्या सालीवर साचलेले पाणी पेशींवाटे आत शोषले जाते, ज्यामुळे द्राक्षांच्या मण्यातील दाब वाढून साल तडकते. आर्द्रता अचानक वाढल्यास मण्यांची लवचिकता कमी होते आणि ते फुटण्यास सुरुवात होते. तडकलेले मणी असलेल्या द्राक्षांची गुणवत्ता घसरते. अशी द्राक्षे निर्यातीसाठी अपात्र ठरतात, ज्यामुळे बागायतदारांचे मोठे परकीय चलन बुडण्याची शक्यता आहे. एकदा मणी तडकले की त्यावर बुरशीजन्य रोगांचा, विशेषतः बोट्रायटिस किंवा कुज रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो. यामुळे उरलेले चांगले घडही खराब होण्याची भीती असते.
द्राक्ष बागा वाचवण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी आणि अनुभवी बागायतदारांनी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हलके आणि नियमित पाणी द्यावे. अचानक पाण्याचा मोठा ताण देऊ नये किंवा एकदम जास्त पाणी देऊ नये. मण्यांची साल मजबूत करण्यासाठी आणि लवचिकता वाढवण्यासाठी कॅल्शियम क्लोराईड किंवा बोरॉनची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. दव साचले असल्यास सकाळी लवकर घडांवरील पाणी झटकून टाकावे, जेणेकरून आर्द्रता कमी होऊन मणी तडकण्याचे प्रमाण कमी होईल. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हवामानातील या बदलांमुळे होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्ती मानून सरकारने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाकडून केली जात आहे.