दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे शेकडो उड्डाणे उशीराने

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळपासून उड्डाणांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण आणि विमान धावपट्टीवर उतरण्यात उशिर झाला. यामुळे प्रवाशांना बरेच तास प्रतीक्षा करावी लागली.

सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीच्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं. ही प्रणाली विमानांच्या उड्डाणांशी संबंधित सर्व डेटा खासकरुन उंची, मार्ग, वेळ, आणि इतर फ्लाइट-सुरक्षा माहिती नियंत्रण केंद्रांना पोहोचवते. ही प्रणाली ठप्प झाल्याने विमानतळावरील संप्रेषण आणि समन्वय बिघडला. परिणामी, दिल्लीहून सुटणारी आणि दिल्लीमध्ये उतरू पाहणारी सत्तर ते ऐशी विमानं किमान तीस ते पन्नास मिनिटांनी उशिरा झाली. काही विमानांना तर प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलं, तर काहींचे वेळापत्रक पुन्हा आखण्यात आले.

प्रवासी सोशल मीडियावरून विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत होते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, पुणे आणि हैदराबादकडे जाणाऱ्या उड्डाणांना सर्वाधिक विलंब झाला. सकाळच्या गर्दीच्या वेळी अचानक बिघाड झाल्याने विमानतळावर दीर्घ रांगा लागल्या, बोर्डिंग प्रक्रियेत गोंधळ झाला.

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि हवाई वाहतूक नियंत्रणाचा तांत्रिक विभागाने या समस्येवर तातडीने काम केले. दिल्ली विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केलं की, प्रवाशांनी आपल्या विमानांची माहिती त्यांच्या विमान कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन किंवा ॲपवरून तपासावेत. दुपारपर्यंत काही प्रमाणात हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली पुन्हा कार्यान्वित झाली असली तरी उड्डाणांचे वेळापत्रक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून काही तास लागू शकतात. विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर वेळेआधी येण्याचं आणि विमानाच्या वेळा पुन्हा तपासण्याचं आवाहन केलं आहे. या तांत्रिक बिघाडामुळे देशातील सर्वात वर्दळीच्या विमानतळावर मोठा ताण निर्माण झाला आहे. विमान कंपन्यांना वेळापत्रक नियंत्रणात आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हवामान, हवाई वाहतूक आणि तांत्रिक अडचणींच्या वाढत्या घटनांमुळे विमानप्रवास सुरळीत ठेवण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीचं आधुनिकीकरण आणि डेटा बॅकअप सिस्टिम्स बळकट करण्याची मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.






22,144 वेळा पाहिलं