इंडिगोवर सरकारची कारवाई – प्रवाशांची गैरसोय महागात पडणार

विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात डिसेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड गोंधळामुळे हजारो प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले होते. या विस्कळीतपणाची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने इंडिगो एअरलाईन्सवर दोन पूर्णांक दोन कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन आणि प्रवाशांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

डिसेंबर २०२५ च्या अखेरीस, खराब हवामान धुके आणि तांत्रिक कारणांमुळे इंडिगोच्या शेकडो विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला होता. या काळात अनेक विमाने रद्द करण्यात आली, तर काहींच्या वेळेत दहा ते बारा तासांचा विलंब झाला. मात्र, या आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना पुरेशी माहिती देणे, त्यांच्या राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था करणे यांसारख्या अनिवार्य सेवा पुरवण्यात कंपनी अपयशी ठरल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या तपासात समोर आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, इंडिगोने खालील नियमांचे उल्लंघन केले आहे. विमान उशीर होणार असल्यास प्रवाशांना वेळेत संदेश किंवा माहिती देण्यात आली नाही. विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना नाश्ता व पाणी आणि पर्यायी प्रवासाची सोपे सोय उपलब्ध करून दिली गेली नाही.

नागरी विमान वाहतूक नियमांमधील कलमांचे पालन करण्यात इंडिगो व्यवस्थापन अपयशी ठरले. या दंडात्मक कारवाईसोबतच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना कडक ताकीद दिली आहे की, प्रवाशांचे हक्क सर्वोच्च आहेत. नैसर्गिक कारणांमुळे विमाने उशिरा धावणे समजण्यासारखे असले तरी, त्या काळात प्रवाशांशी अमानवीय वर्तन किंवा त्यांना वाऱ्यावर सोडणे सहन केले जाणार नाही. विशेष म्हणजे, इंडिगोला या प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, मात्र कंपनीने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. डिसेंबरमधील त्या गोंधळादरम्यान सोशल मीडियावर इंडिगोच्या विरोधात तक्रारींचा पूर आला होता. अनेक प्रवाशांनी विमानतळाच्या जमिनीवर झोपलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. काही ठिकाणी प्रवाशांनी वैमानिक आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याच्या घटनाही घडल्या होत्या. या जनक्षोभामुळेच मंत्रालयाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या दंडाबाबत इंडिगोने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र कंपनी कायदेशीर पर्यायांचा विचार करू शकते. यापूर्वीही इंडिगोला सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड सोसावा लागला आहे, परंतु दोन पूर्णांक दोन कोटी रुपयांचा हा दंड अलीकडच्या काळातील सर्वात मोठा दंड मानला जात आहे.






19,452 वेळा पाहिलं