भारत – कॅनडात नव्या धोरणात्मक पर्वाची सुरुवात

भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणावानंतर आता दोन्ही देशांनी आर्थिक आणि ऊर्जा संबंधांना नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कच्च्या तेलाचा पुरवठा आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यापारात मोठी वाढ करण्याची ग्वाही दिली. यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

कॅनडाकडे तेलाचा अफाट साठा आहे, तर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक देश आहे. ही पूरक स्थिती लक्षात घेऊन दोन्ही देशांनी ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारीचा निर्णय घेतला आहे. भारत आता कॅनडाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करणार आहे. यामुळे भारताचे रशिया आणि आखाती देशांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. केवळ कच्चे तेलच नव्हे, तर पेट्रोलियम उपपदार्थ आणि शुद्धीकरण तंत्रज्ञानाबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य होणार आहे. कॅनडातील तेल क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांनी गुंतवणूक करावी आणि कॅनडाने भारतातील ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये रस दाखवावा, यावरही प्राथमिक चर्चा झाली आहे.

कॅनडा सध्या आपल्या तेलासाठी प्रामुख्याने अमेरिकन बाजारपेठेवर अवलंबून आहे. मात्र, अमेरिकेतील राजकीय बदलांनंतर कॅनडा आता आशियाई बाजारपेठांकडे, विशेषतः भारताकडे एक विश्वसनीय भागीदार म्हणून पाहत आहे. दुसरीकडे, भारताला आपल्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जेची गरज आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील ऊर्जा व्यापार वाढवण्याचा हा संकल्प केवळ आर्थिक नसून धोरणात्मक आहे. या माध्यमातून दोन्ही देशांनी जुने मतभेद बाजूला सारून विकासाच्या वाटेवर एकत्र चालण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात आशिया आणि उत्तर अमेरिका खंडातील ऊर्जा समीकरणे बदलण्याची शक्यता जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.






9,870 वेळा पाहिलं