
अमेरिकेने रशियावर घातलेल्या निर्बंधानंतर भारताने डिसेंबर मध्ये रशियाकडून केलेल्या तेल आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. डिसेंबरमध्ये भारताने रशियाकडून बारा लाख पिंपे तेल खरेदी केले होते. नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण अठरा लाख चाळीस हजार पिंपे होते. डिसेंबर 2022 नंतर भारताने पहिल्यांदाच रशियाकडून इतक्या कमी प्रमाणात तेल घेतले आहे. अमेरिकेने रशियाच्या रोझनेफ्ट आणि ल्यूकॉइल या मोठ्यातील निर्यात कंपन्यावर निर्बंध घातल्यामुळे भारत आणि रशिया दरम्यान तेल व्यापारात अडथळे निर्माण झाले आहेत. सध्या भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या अमेरिकेने निर्बंध न घातलेल्या रशियन कंपन्यांकडून तेल खरेदी करत आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर भारताने सौदी अरेबिया, कुवेत, अमेरिका या देशाकडून तेल खरेदीत वाढ केली आहे.
गेल्या काही महिन्यांपर्यंत रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनला होता. मात्र, निर्बंधांमुळे रशियाच्या सोकोल ग्रेड तेलाची जहाजे भारताच्या किनाऱ्याजवळ पोहोचूनही पेमेंट आणि विम्याच्या तांत्रिक अडचणींमुळे परत गेली आहेत. रशियाकडून मिळणारे तेल महाग होऊ लागल्याने किंवा त्याच्या वाहतुकीत जोखीम वाढल्याने भारतीय तेल कंपन्यांनी आता पुन्हा सौदी अरेबिया आणि इराकसारख्या पारंपरिक आखाती देशांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
भारत सरकारने नेहमीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, देशाची ऊर्जा सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. अमेरिका भारतावर रशियाकडून तेल न घेण्याबाबत दबाव टाकत आहे, तर दुसरीकडे भारत आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करत रशियाशी व्यवहार सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉलरला पर्याय म्हणून रुपया-रुबल व्यापार सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र रशियाकडे साठलेल्या रुपयांचा वापर कसा करायचा, हा प्रश्न सुटलेला नाही.
रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल बंद झाले, तर त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास वाहतूक खर्च वाढेल, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. भारताला तेल आयातीसाठी अधिक परकीय चलन खर्च करावे लागेल, ज्याचा ताण देशाच्या तिजोरीवर पडू शकतो. रशियाने निर्बंधांना तोंड देण्यासाठी स्वतःची शॅडो फ्लीट म्हणजे अशी जहाजे तयार केली आहेत ज्यांना पाश्चिमात्य विमा संरक्षण नाही. मात्र, अमेरिकेने आता या गुप्त जहाजांची ओळख पटवून त्यांच्यावरही बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.