जागतिक सुरक्षेसाठी भारत-अमेरिका एकत्र

भारत आणि अमेरिकेतील संरक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी दहा वर्षांच्या दीर्घकालीन संरक्षण करारावर स्वाक्षरी केली असून हा करार आगामी दशकभर दोन्ही देशांच्या सुरक्षा, संरक्षण तंत्रज्ञान आणि रणनीतिक सहकार्याला नवी दिशा देणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक करार पार पडला.

गेल्या काही महिन्यांपासून भारत-अमेरिका व्यापारी संबंधांमध्ये ताण निर्माण झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्क्यांपर्यंत आयातशुल्क लादल्याने आणि रशियाकडून तेल खरेदीवरून सातत्याने टीका केल्याने दोन्ही देशांमधील व्यापार चर्चांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. तरीदेखील, संरक्षण क्षेत्रात मात्र दोन्ही देशांनी एकत्र येत जागतिक सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक्सवर लिहिलं की, “भागीदारी वाढवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. अमेरिकेने भारताबरोबर दहा वर्षांच्या संरक्षण आराखड्यावर स्वाक्षरी केली असून, दोन्ही देशांचे संरक्षण संबंध याआधी कधीही इतके मजबूत नव्हते.”

या करारामुळे संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त सैनिकी सराव, आणि रणनीतिक माहितीची देवाणघेवाण अधिक मजबूत होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हा करार भारताच्या स्वावलंबी संरक्षण क्षमतेला बळ देईल आणि दोन्ही देशांच्या इंडो-पॅसिफिक प्रदेशातील प्रभावाला नव्या पातळीवर नेईल.






1,784 वेळा पाहिलं