अमेरिका – भारत व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी संकटात

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण बनले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा थांबली असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता भारत आणि अमेरिका यांच्यात नव्या व्यापार कराराची चर्चा सुरू असून तो लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचेल, अशी माहिती मिळत आहे. या करारानुसार अमेरिका भारतात मोठ्या प्रमाणावर मक्का आयात करणार असल्याने भारतीय शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर मक्का भारतात येऊ लागल्यास देशांतर्गत मक्क्याच्या किंमतींवर मोठा परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना आधीच घटलेल्या बाजारभावाचा आणखी फटका बसू शकतो. अमेरिकेचा मक्का तुलनेने स्वस्त असल्याने देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणे कठीण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टनुसार, अमेरिका जगातील सुमारे पस्तीस टक्के मक्क्याचे उत्पादन करते, तर भारताचे उत्पादन केवळ तीन टक्के आहे. अमेरिकेने या आधी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावले होते, ज्यामुळे भारताच्या काही उद्योगांना मोठा फटका बसला. त्यानंतर भारताने त्या टॅरिफमधून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले असले तरी, दोन्ही देशांतील व्यापारसंबंध अद्याप तणावपूर्ण आहेत.

अमेरिकेच्या या नव्या मक्का आयात करारामुळे भारतीय बाजारपेठेत विदेशी मक्क्याची भर पडणार आहे. यामुळे भारतीय मक्क्याची मागणी घटेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल. अहवालांनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील हा करार पुढील दोन ते तीन दिवसांत अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी संघटनांनी या कराराला तीव्र विरोध दर्शविला आहे.

भारतीय शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या दबावाखाली भारताने हा करार करू नये. कारण यामुळे देशातील अन्नधान्य बाजारात परकीय प्रभाव वाढेल आणि शेतकऱ्यांची स्पर्धात्मकता कमी होईल. टॅरिफ आणि आयात करारांच्या या गुंतागुंतीत भारत-अमेरिका संबंध सध्या तणावात असले तरी, या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होत असल्याचे स्पष्ट दिसते.






18,038 वेळा पाहिलं