भारताचे स्वदेशी ड्रोन लवकरच झेप घेणार

भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक मोठी झेप घेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ‘कॅट्स वॉरियर’ हे स्वदेशी मानवरहित लढाऊ विमान विकसित केले आहे. हे विमान ‘लॉयल विंगमॅन’ या संकल्पनेवर आधारित असून, मानवी वैमानिकासोबत मिशनमध्ये सामील होऊन त्याचा मदतनीस म्हणून कार्य करणार आहे. यामुळे युद्धात वैमानिकांचा धोका कमी होणार असून अचूकतेने लक्ष्य भेदता येणार आहे.

हे यंत्र चालवण्यास वैमानिकाची प्रत्यक्ष गरज नसते. ‘कॅट्स वॉरियर’ शत्रूच्या रडार यंत्रणांवर हल्ला करणे, गुप्तचर माहिती गोळा करणे, क्षेपणास्त्रे डागणे आणि आवश्यक असल्यास आत्मघाती कारवायाही करू शकतो. विशेष म्हणजे, याचे सर्व नियंत्रण मातृ विमानाकडून केले जाते. हे तेजस, सुखोई किंवा जग्वार यांसारख्या भारतीय लढाऊ विमानांसोबत कार्य करू शकते.

या यंत्राची झेप सुमारे नऊ हजार मीटर पर्यंत असून, सामान्य मोडमध्ये तीनशे किलोमीटर आणि आत्मघाती मोडमध्ये आठशे किलोमीटर पर्यंत कारवाई करू शकते. याचे वजन सुमारे दोन टन आहे. यात आधुनिक क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि रडार जाम करणारी उपकरणे लावण्यात आली आहेत, जे शत्रूपक्षाला अंधारात ठेवण्यास मदत करतात.

‘कॅट्स वॉरियर’मध्ये आधुनिक सेन्सर्स, AESA रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मिशन नियोजनाची क्षमता आहे. हे स्वयंचलितपणे मार्ग आखू शकते, धोक्याचा अंदाज घेऊ शकते आणि त्यानुसार कारवाईही करू शकते. यामुळे पारंपरिक ड्रोनपेक्षा हे अधिक सक्षम, अचूक आणि चपळ ठरते.

या योजनेचा उद्देश भविष्यातील युद्धप्रणालीत भारतीय हवाई दलाला स्वावलंबी बनवणे आहे. HAL व NewSpace या खाजगी कंपनीच्या सहकार्याने तयार होणारे हे यंत्र डिसेंबर २०२५ पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होण्याची शक्यता आहे. हे यंत्र केवळ तांत्रिक प्रगतीच नव्हे तर भारताच्या सामरिक स्वावलंबनाचं प्रतीक ठरणार आहे.






288 वेळा पाहिलं