इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होणार – आळंदीत विकासकामांचे भूमिपूजन

देहू आणि आळंदी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची आणि संतपरंपरेची तीर्थक्षेत्रे आहेत. या पवित्र स्थळातून वाहणारी इंद्रायणी नदी ही भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा ठाम संकल्प असून, या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचे नसून आपल्या श्रद्धेचेही प्रतीक असल्याने प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आळंदी नगरपरिषदेच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्र ही संतांची आणि शूर-वीरांची भूमी आहे. वारकऱ्यांच्या हितासाठी शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये वारकरी भवन उभारणी, दिंड्यांसाठी अनुदान, तसेच वारकरी विमा योजना यांचा समावेश आहे. मंदिर हे संस्कार केंद्र असल्याने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांसाठीचा निधी दोन कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आगामी कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी नगरविकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासन ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. धर्म, प्रथा आणि परंपरा यांचा सन्मान राखत भागवत धर्माची पताका उंच ठेवण्याचे कार्य शासन सातत्याने करीत आहे, असे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, आळंदी येथे ‘ज्ञानपीठ’ स्थापनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून, त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तसेच गोमातेला ‘राज्य माते’चा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. भारत आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्राचे योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रभावी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आळंदी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या. हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच रुग्ण तपासणी केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचे आणि भक्तनिवासाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.






4,526 वेळा पाहिलं