आझाद मैदानात नवीन फौजदारी कायद्यांचे माहिती प्रदर्शन सुरू

केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नव्याने तयार केलेले फौजदारी कायदे देशभरात लागू केले आहेत. नवीन सुधारित संहितांची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली असून, याविषयी सर्वसामान्यांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी शासनाने विविध उपक्रम राबविले आहेत.

या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आझाद मैदान येथे पाच दिवसीय जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम 19 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चालणार असून, नागरिकांना नवीन कायद्यांची समज व्हावी यासाठी विविध माहितीपर सादरीकरणे ठेवण्यात आली आहेत.

प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले असून, येथे विविध शासकीय विभागांची माहिती देणारी दालने उभारण्यात आली आहेत. यामध्ये नियंत्रण कक्ष, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय, न्यायवैद्यक व विषशास्त्र विभाग, अभियोग संचालनालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, उच्च न्यायालय तसेच मध्यवर्ती कारागृह यांचे स्वतंत्र माहिती स्टॉल्स तयार करण्यात आले आहेत.

नवीन फौजदारी कायद्यांची मांडणी अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी प्रदर्शनात नाट्यरूपांतरणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करणे, तसेच नव्या संहितांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते याची झलक देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या महत्त्वपूर्ण जनजागृती प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांनी केले आहे. विशेषत: विधिशाखेतील विद्यार्थी, अभ्यासक, तसेच वकील यांनी या बदलत्या कायदेशीर व्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी प्रदर्शनाला उपस्थित राहावे, असे त्यांनी नमूद केले आहे.






13,909 वेळा पाहिलं