शाई निर्मिती

कमी भांडवलात निश्चितपणे फायदेशीर उद्योग शोधत असाल तर शाई उत्पादन उद्योग हा एक चांगला पर्याय आहे. या मालाला वर्षभर मागणी असते. दैनंदिन जीवनातील सर्व लिखित कामांसाठी शाईची आवश्यकता असते. शाळेतील मुलांना लिहिण्यापासून ते सरकारी आणि खासगी कार्यालयात शिक्के मारण्याच्या कामापर्यंत शाई लागते.
शाईचे पेन असो किंवा बॉल पेन त्यासाठी शाईची गरज असते. शिक्के, अंगठ्याचे ठसे यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या शाईचा वापर केला जातो. शाईचे वेगवेगळे प्रकार असतात. बॉल पेन शाई, स्टॅम्प रॉयल, रायफल शाई, ब्लॅक रॉयल, लाल शाई, पेंटिंगच्या कामात वापरली जाणारी काळी, निळी, लाल शाई अशा अनेक प्रकारच्या शाई आहेत.
शाई तयार करणेदेखील सोपे आहे. शाईची विक्री किंमत कमी आहे. बाराही महिने नियमित ग्राहक उपलब्ध असतात. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे उद्दिष्ट असेल तर छापखान्यासाठी लागणारी शाई तयार करून ते शाईचा पुरवठा करू शकतात. सध्या आधुनिक प्रकारची शाईही आली असून त्यासही मागणी चांगली आहे. उदाहरणार्थ, स्व-प्रकाशित चमकणारी शाई, लाखाची शाई, सोनेरी शाई, सुगंधी शाई इत्यादी प्रकार आहेत. शाई करण्यासाठी आवश्यक घटकांचे प्रमाण निश्चित करावे लागते. प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळे प्रमाण असते. शाई बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे व्यापारी, वितरक, यंत्र उत्पादक कंपन्या शाई बनविण्याचे प्राथमिक ज्ञान देतात.
परंतु तरीही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. उच्च दर्जाची शाई तयार करता यायला हवी. उत्पादनाचा विस्तार मोठा असेल तर कुशल मजूर घ्यावेत. जर तुम्ही गृहउद्योगाच्या स्वरुपात स्वतः करीत असाल तर स्वतः शाई बनविण्याची सूत्रे जाणून घ्या. शाई तयार करणे हा रासायनिक उद्योग असल्याने, हे रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले उत्पादन आहे. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याकरिता थेट उत्पादन सुरू असलेल्या ठिकाणी जा. अनुभवातून उत्पादन सुरू करा. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित पहा. शाई विकण्यासाठी विशेष दुकाने नसतात; मात्र शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वापरामुळे शाळा, महाविद्यालयांच्या आसपासच्या स्टेशनरी दुकानांमधून शाई विकता येते.
स्टेशनरी दुकानात शाई पेनसाठी वापरलेली शाई अर्ध्या लिटरमध्ये दिली जाऊ शकते. प्लास्टिकच्या पारदर्शक बाटल्यांमध्ये भरून ती विकता येते. स्टेशनरी दुकाने, किराणा दुकाने, येथे विक्रीसाठी शाई देऊ शकता. या उद्योगासाठी डिस्टिल्ड वॉटर, मिनरल ऑइल, निग्रासिन, ओलिक ॲसिड, टार्टरिक ॲसिड, ऑक्सॅलिक ॲसिड, कार्बोलिक ॲसिड, टॅनिक ॲसिड, सल्फ्यूरिक ॲसिड, लो ग्रेड हायड्रोलिक ॲसिड, गॅलिक ॲसिड, सल्फेट आणि फेरस सल्फेट, विद्राव्य निळा, काळा, लाल, हिरवा रंग, अरबी पावडर, ग्लिसरीन, एसीटोन मिथाइल वायलेट, व्हिक्टोरिया ब्लू, इंक फिलिंग बाटल्या, वेसल्स इ. कच्चा माल आवश्यक आवश्यक असतो. यंत्रसामग्रीमध्ये शाई भरण्याचे यंत्र, नोजल फिटिंग मशीन, पंचिंग मशीन, सेंट्रीफ्यूज मशीन, हॉट स्टॅम्पिंग मशीन, मिक्सर, वजन यंत्र, रासायनिक उपकरणे इ. यंत्रांची आवश्यकता असते.