
नवी मुंबईतील खारघर परिसरात स्थापन होत असलेल्या नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक नऊ या संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक सर्व माहितींसह प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
सहकार मंत्री पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, तसेच सह सचिव संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत संस्थेच्या नोंदणीसंबंधी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेसाठी नियमानुसार आवश्यक असलेली सभासद संख्या काही कारणास्तव पूर्ण होत नसल्याने, या संस्थेची नोंदणी विशेष प्रकरण म्हणून मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
दरम्यान, मजूर सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मजूर सहकारी संस्थांना शासनाच्या नियमांनुसार कामे मिळावीत यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधावा, असेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सूचित केले.
या बैठकीस राज्यभरातील मजूर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी शासनाकडे आपापल्या मागण्या मांडल्या असून, त्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.