गाझामध्ये इस्रायलचे पुन्हा हवाई हल्ले

गाझा पट्ट्यात इस्रायलने रविवारी केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यांत किमान तेहतीस जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.

गाझा शहरातील रहिवासी इमारतींवर इस्रायलच्या लष्कराने हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत काही संपूर्ण कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शिफा रुग्णालयाचे डॉक्टर मोहम्मद अबु सेलमिया यांनी सांगितले की, एका घरावर झालेल्या हल्ल्यात वीस जणांचा मृत्यू झाला असून पंचवीसपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

तसेच, गाझा परिसरातील खान युनिस जवळील मुवासी भागात झालेल्या हल्ल्यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक घरे कोसळली असून ढिगाऱ्याखाली अजूनही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इस्रायल लष्कराने या हल्ल्यांविषयी सांगितले की, त्यांनी गाझामधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून कारवाई केली आहे. युद्धसदृश परिस्थितीत संशयित दहशतवादी अड्डे, शस्त्रसाठे आणि नेतृत्व केंद्रे उद्ध्वस्त केल्याचा दावा लष्कराने केला आहे.

दरम्यान, युद्धविरामासाठी कतार येथे चर्चा सुरू असून तात्पुरता शांतता करार घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे या चर्चेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

गाझा युद्धाला जवळपास नऊ महिने पूर्ण होत आले असून या काळात हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून अन्न, पाणी, औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.






21,656 वेळा पाहिलं