
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रोने आपल्या शक्तिशाली एलव्हीएम तीन- एम पाच या रॉकेटद्वारे सीएमएस – शून्य तीन या भारताच्या सर्वात जड कम्युनिकेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून करण्यात आले.
शक्तिशाली एलव्हीएम तीन हे इस्रोचे सर्वात शक्तिशाली हेवी-लिफ्ट रॉकेट आहे. या रॉकेटला बाहुबली रॉकेट असेही संबोधले जाते. या रॉकेटची उंची सुमारे त्रेचाळीस मीटर आणि वजन सहाशे चाळीस टनांहून अधिक आहे.
यामध्ये तीन टप्प्यांची उड्डाण रचना आहे. हे रॉकेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपग्रह भू-समान कक्षेत पोहोचवण्यास सक्षम आहे. हा उपग्रह चार हजार चारशे दहा किलोग्रॅम वजनाचा असून भारतातून आतापर्यंत प्रक्षेपित झालेला सर्वात जड संवाद उपग्रह मानला जातो. उपग्रहाचे उद्दिष्ट म्हणजे भारत व आजूबाजूच्या समुद्री प्रदेशांसाठी उच्च दर्जाची कम्युनिकेशन आणि सॅटेलाइट सेवा उपलब्ध करून देणे. यामध्ये कु-बँड आणि सी-बँड या दोन्ही प्रकारचे ट्रान्सपॉंडर्स बसवले गेले आहेत, ज्यामुळे विविध प्रकारच्या दूरसंचार सेवा, टीव्ही प्रसारण, नेव्हिगेशन, आपत्ती व्यवस्थापन, आणि सागरी संवाद शक्य होतील.
उपग्रहाचे अपेक्षित आयुष्य पंधरा वर्षे आहे. प्रक्षेपणानंतर केवळ सोळा मिनिटांमध्ये उपग्रहाने आपली नियोजित कक्षा प्राप्त केली. या मोहिमेत वापरलेले सी पंचवीस क्रायोजेनिक इंजिन दोन वेळा पुन्हा प्रज्वलित करण्यात आले, ज्यामुळे भविष्यात विविध उंचींच्या कक्षांमध्ये उपग्रह पोहोचवणे सोपे होईल. इस्रोच्या टीमने रॉकेटच्या कार्यक्षमतेत सुमारे दहा टक्के सुधारणा केली आहे.
भारत आता आपल्या सर्व प्रकारच्या संवाद उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण स्वयंपूर्णपणे करू शकतो. सागरी क्षेत्रात संवाद व माहिती पुरवणे हे संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. एल व्ही एम तीन च्या सातत्यपूर्ण यशामुळे इस्त्रो जगभरातील ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपण सेवा देऊ शकतो, ज्यातून परकीय चलन उत्पन्न होईल. भारताचा क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान आता परिपक्व टप्प्यावर पोहोचला आहे, जे काही दशकांपूर्वी रशिया आणि अमेरिकेपुरते मर्यादित होते.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षमतेला अधिक बळकट करते आणि आगामी गगनयान मोहिमेसाठी आत्मविश्वास वाढवते.