जंगली जयगड किल्ला

सातारा जिल्यातील ‘पाटण’ तालुक्यात ‘जंगली जयगड’ला जाण्यासाठी पायथ्याचे गाव म्हणजे ‘नवजा’ आहे. येथे जाण्यासाठी कोयनानगर येथून सकाळी बस आहे. ‘नवजा’ हे ‘शिवसागर’ जलाशयाच्या काठावर वसलेले सुंदर आणि रमणीय असे गाव आहे. नवजा गावातून साधारणतः दीड ते दोन तासात पायी चालत गडावर जाणाऱ्या पायवाटेजवळ जाऊन पोहोचाल.

आपण या पायवाटेने वर गेल्यावर गडावरील ‘घोडतळ’ दिसते. इंग्रजांच्या काळात ‘जंगली जयगड ला आल्यानंतर याठिकाणी घोडे बांधले जायचे, म्हणून याला ‘घोडेतळ’ असे संबोधले जाते. याठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा देखील बघायला मिळेल.

कोयना नदीच्या परिसरात असलेला हा किल्ला पुढे जात असताना कोयनेचे दर्शन देत राहतो. गडावर जाणारी पायवाट दाखविण्यासाठी वन विभागाने जागोजागी दगडधोंडे रचून ठेवले आहेत. काही अंतर पुढे चालून गेल्यावर एक गोल ओटा लागतो. या ओट्यावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या पायऱ्यांवर चढून वर गेले की येथे ‘झेंडा बुरुज’ मिळतो.

गडावर जाताना 2 सुळके दिसतात. याला लोक ‘दीपमाळ’ असे म्हणतात. एका डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर मुख्य गड दिसतो. ‘जंगली जयगड’ सन 1967 साली झालेल्या भयंकर भूकंपात मोडकळीस आला. गडाच्या मुख्य दरवाजाचे दगड कोसळले आहेत.

गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना गडदेवता ठाणाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरासमोर छोटीशी दीपमाळ आहे. तिथे काही दगडी भांडी आहेत. गडावर असे दुर्गावशेष पाहण्यास मिळतात. पुढे राजवाड्याच्या चौथऱ्याचे काही अवशेष बघायला मिळतात. इथून वासोटा, मधू मकरंदगड यांचे देखील दर्शन होते. पोफळी घाट देखील आपल्याला इथून बघायला मिळतो.

‘जंगली जयगड’ असलेल्या वनामध्ये मोठ्या औषधी वनस्पती आणि खुरट्या वनस्पतीसुद्धा आहेत. ऐन, अंजनी, वेत, कुंभा, जांभूळ आणि आंबा ही काही झाडे या भागात आढळतात. भेकर, सांबर, बिबट्या, जंगली कुत्रे, गवा आणि भरपूर विविधता असलेले प्राणीदेखील येथे आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शनही येथे होत असते. या जंगलामध्ये अस्वले देखील आहेत; परंतु शक्यतो ती दिसत नाहीत.






185 वेळा पाहिलं