जळकोट-उदगीर महामार्गाचे काम सहा वर्षांपासून रखडले – नागरिक त्रस्त
नांदेड – जळकोट – बिदर या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासचे काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित दहा टक्के काम अपूर्ण असल्याने या महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या महामार्गाचे उद्घाटन दोन वर्षांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. पण उद्घाटन होऊनही रस्ता अपूर्ण आहे.
जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहे. हे काम केवळ रस्त्याचे नसून, त्या ठिकाणच्या पुलाचेही आहे. नव्वद टक्के महामार्ग पूर्ण झाल्याचे दाखवत त्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या दहा टक्के अपूर्ण कामामुळे स्थानिक वैतागलेत. अपूर्ण रस्त्यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात धूळ उडते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांमध्ये आणि शेतीतही ही धूळ पसरत आहे. या धुळीमुळे अनेक गावकऱ्यांना श्वसनाचे दुर्धर आजार जडले आहेत, तसेच लहान मुले आणि वयोवृद्धांना फुफ्फुसांच्या विकारांचा सामना करावा लागत आहे.
केवळ धुळीचा त्रास नाही, तर या अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होते. मागील पावसाळ्यात, अपूर्ण पुलाच्या आणि रस्त्याच्या कामामुळे हा मार्ग तब्बल दहा दिवसांसाठी बंद झाला होता. परिणामी, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अत्यावश्यक सेवा, रुग्णांची वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. या भागातून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत आहे.
जळकोटच्या दिशेने येणाऱ्या नांदेडच्या बाजूला, कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. नांदेड-जळकोट या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा अपूर्ण असल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी पूल नसल्यामुळे प्रशासनाला पर्यायी मार्गाने वाहतूक वळवावी लागली आहे. नांदेडला जाण्यासाठी बहादरपुरा मार्गेचा रस्ता सर्वात जवळचा असताना, केवळ या एका पुलाच्या अभावी प्रवाशांना लांब पल्ल्याचा घोडज मार्गे प्रवास करावा लागत आहे.
जवळपास एक ते दीड महिन्यापासून या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे आणि अवजड वाहनांना तर या मार्गावर प्रवेश पूर्णपणे वर्जित करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक व्यापार, कृषी मालाची वाहतूक आणि औद्योगिक विकासावर विपरित परिणाम झाला आहे. वेळेत माल पोहोचत नसल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर होऊन आणि त्याचे नव्वद टक्के काम पूर्ण होऊनही, गेल्या सहा वर्षांपासून केवळ दहा टक्के काम रखडणे हे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्पष्ट दुर्लक्ष दर्शवते. कंत्राटदाराच्या दिरंगाईवर नियंत्रण ठेवण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. सहा वर्षांपासून अपूर्ण असलेल्या या रस्त्यामुळे सामान्य नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय, वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच या विषयाकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी, नागरिक आणि वाहनधारकांनी केली आहे.