कांचन किल्ला

अजिंठा सातमाळा रांगेत पूर्व-पश्चिम दिशेने कांचन किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली होती. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर ही लढाई झाली. ‘बारी’ या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कांचन’ किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी, असे म्हंटले जाते. कांचन किल्ला तीन भागात विभागलेला आहे. दोन मुख्य भाग कांचन व मंचन म्हणून ओळखले जातात. किल्ल्यावर जाण्यासाठी खेळदरी गावातून जावे लागते. गडाच्या पूर्वेकडील कातळ टप्प्याकडे पोहाचवण्यास तीन तास लागतात. उजवीकडे गेल्यावर गुहा पाहायला मिळते.

माथ्यावर रांगेत खोदलेली पाण्याची ५ टाके आहेत. थोडी तटबंदी शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पाण्याचे टाक व गुहा पहायला मिळतात. त्यांच्यापुढे दोन थडगी, उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. येथे जाण्यासाठी प्रथम नाशिकला जावे. नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकातून सटाण्याला जाणारी बस पकडून खेळदरी गावात उतरावे. या गडावर राहण्याची, जेवणाची सोय नसून पिण्याचे पाणी आहे.

या परिसरात झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. सन १६७० मध्ये सुरतेची दुसऱ्यांदा प्रचंड लुट करुन महाराज बागलाणच्या दिशेने निघाले. त्यानंतर दाऊदखान हा मोगली सरदार बर्‍हाणपूराहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. चांदवडजवळ पोहोचताच स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगररांग ओलांडणे आवश्यक होते. तेथेच दाऊदखान येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराजांनी रात्रीच आपल्या १५००० फौजेपैकी पाच हजार पायदळ, लुटीची घोडी व सामान पुढे पाठवून स्वत: १०००० फौजेनिशी मागे राहिले होते. सकाळच्या वेळी युध्दाला सुरूवात झाली. या युध्दात खुद्द महाराजांसह प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगली सेनेचा दारुण पराभव झाला. हे युद्ध मैदानात समोरासमोर झाले.






25,070 वेळा पाहिलं