
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. ‘बिंदुसरा’ नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने दहाव्या ते 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियांतील आर्यनाथ, नेमिनाथ या २ तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह असून ते पाचशे वर्षांपासून बंद आहे.
हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे.
मुखमंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून ३ बाजूंना गर्भगृहे आहेत. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची आहेत. मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या ४ मुख्य दिशांना आणि ४ उपदिशांना सोळा स्तंभ आहेत. या स्तंभांवर घुमटाकार छत आहे. छतावर फुलांची सुंदर नक्षी असून मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.
मंदिराच्या बाहेर शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांचे दरवाजे द्वारे पंचशाखा प्रकारचे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या डोक्यावर गणेशमूर्ती आहे. या पुरातन मंदिराचा उल्लेख पुराण ग्रंथातही आहे.
अत्री ऋषी आणि अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रह्मा-विष्णू आणि महेशाला प्रसन्न करून घेतल्याची कथा सांगितली जाते. कंकालेश्वर मंदिर अनेक वर्षे बंद होते. महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी अर्थात हैदराबाद स्वातंत्र्य दिनादिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.
हे मंदिर विलक्षण सुंदर असून कोरीवकाम, शिल्पकला लक्षवेधी आहे. शेकडो वर्षे जुने मंदिर पाहताक्षणी आवडते. भाविकांची येथे वर्दळ असते. त्यातही महाशिवरात्री, श्रावणी सोमवार या दिवशी येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येतात. मंदिराचे काम, स्थापत्यशैली पाहण्यासही इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून उपस्थित असतात.
बीडमध्ये अन्य पर्यटनस्थळेही प्रेक्षणीय आहेत. येथील खंडोबा मंदिर, जामा मशीद, हजरत शहंशाह वली दर्गा, परळीतील श्री वैजनाथ मंदिर, अंबेजोगाईतील श्री योगेश्वरी माता मंदिर पाहण्यासारखी आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते.