
बालाघाट डोंगररांगेवर ‘कुंजरगड’ हा एक किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या गावातून हा गड हत्तीसारखा प्रचंड दिसतो. या किल्याशीचे दुसरे नाव ‘कोंबडगड’ असेही आहे. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळा ऐन भरात असताना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडसारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत. सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. कुंजरगड – भैरवगड हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनई गावी मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते.
कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्यामधून जाणार्या वाटेने गडावर पोहोचण्यास कमी वेळ लागतो. गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. गडाला वळसा घालून जाताना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्या मुर्तीला काळोबा म्हणतात.
किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. अर्ध्या पायर्या चढल्यावर डोंगराच्या आरपार खोदलेली एक गुहा आहे. ही गुहा पाहून पायऱ्यांच्या मार्गाने उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर पोहोचता येते. समोर उद्ध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. उजव्या बाजूला पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात.या वाड्यामागे दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते. या गडावर राहण्याची सोय नाही. विहिर गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.