
उत्तर सिक्कीममधील चट्टन भागात रविवारी 1 जून 2025 संध्याकाळी सात वाजता झालेल्या भीषण भूस्खलनामुळे लष्करी छावणीवर मोठे संकट ओढावले आहे. या दुर्घटनेत किमान तीन सैनिकांचा मृत्यू झाला असून, नऊ जवान बेपत्ता आहेत. बचाव कार्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
भूस्खलनामुळे परिसरातील अनेक घरे आणि रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः लाचेन आणि लाचुंग भागात सुमारे पंधराशे पर्यटक अडकले होते. प्रशासनाने रस्ते मोकळे करून आज सकाळपासून पर्यटकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केले आहे. या आपत्तीमुळे उत्तर सिक्कीममध्ये वाहतूक आणि संचार व्यवस्था खंडित झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे अधिक भूस्खलन होण्याची शक्यता आहे.

राज्य आणि केंद्र सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.