राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

राज्यातील अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, त्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने उद्या दिनांक ९ जुलै 2025 रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. या अनुषंगाने निवडणुका जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील राजकीय हालचालींनाही जोर येऊ लागला आहे.

राज्यभरात जवळपास १४ हजारांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड यांसारख्या मोठ्या महानगरपालिका तसेच अनेक नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश आहे. तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही रखडल्या आहेत.

या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. अनेक राजकीय पक्षांनी तयारीस सुरुवात केली असून कार्यकर्त्यांच्या बैठका, दौरे, संपर्क मोहिमा सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्थानिक निवडणुकांचे परिणाम महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याकडे गांभीर्याने पाहत आहेत.






16,087 वेळा पाहिलं