
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावला आहे. पाणी संवर्धन, व्यवस्थापन आणि जलसंपदा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राला हा सन्मान मिळाला असून, राज्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेला “सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था” या गटात प्रथम क्रमांक, तर कनिफनाथ पाणी वापर सहकारी संस्था, नाशिक हिला “सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था” या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळाला आहे. जल व्यवस्थापनातील जनसहभाग आणि नवकल्पनांचा यशस्वी नमुना म्हणून या संस्थांचा गौरव करण्यात आला आहे.
या सन्मानाबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कान्ता राव यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांना पत्राद्वारे कळविले आहे. पुरस्कार वितरण समारंभ 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणार असून, राज्याला ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्याच्या जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच संपूर्ण जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी राज्याच्या जल उपक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील ही मान्यता ऐतिहासिक असल्याचे नमूद केले आहे.
या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीच्या ध्येयाला अधिक गती मिळेल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. तर मंत्री गिरीश महाजन यांनी हा सन्मान राज्यातील जलसंपदा विभागाच्या विकास कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर असल्याचे सांगून, पाणी संवर्धनाच्या उपक्रमांना ही नवी ऊर्जा देणारी घटना असल्याचे मत व्यक्त केले.