अमृत दुर्गोत्सवामुळे महाराष्ट्राचा गौरव जागतिक पातळीवर
महाराष्ट्र राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या उपक्रमाने ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ‘अमृत’ संस्थेला प्रदान करण्यात आले असून, सदर प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सुपुर्द करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, तसेच अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अमृत’ संस्थेच्या या यशाचे कौतुक करताना म्हटले की, महाराष्ट्राची दुर्गसंस्कृती ही आपल्या इतिहासाचे अभिमानाचे प्रतीक आहे. ‘अमृत दुर्गोत्सव’ उपक्रमाद्वारे नव्या पिढीला या ऐतिहासिक वारशाशी जोडण्याचे उल्लेखनीय कार्य संस्थेने केले असून, हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्राचा आहे.
‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या उपक्रमांतर्गत युनेस्को मान्यताप्राप्त बारा ऐतिहासिक गड-दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत नागरिकांना सेल्फी काढून ते दुर्गोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये आणि परदेशातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात आले. या उपक्रमामुळे राज्यातील दुर्गसंस्कृती आणि ऐतिहासिक वारशाबद्दल जनजागृती वाढून नव्या पिढीत अभिमानाची भावना दृढ झाली, असे मत सहभागी नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.