महाराष्ट्र निसर्ग उद्यान

मुलांना सुट्टी लागली की दर आठवड्याला कुठेतरी बाहेर फिरायला न्यावंच लागतं. मुंबईतील निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ होय. ३७ एकरांच्या कचऱ्याच्या ढीगाऱ्याखालील जमिनीचे परिवर्तन या निसर्ग उद्यानात करण्यात आलेले आहे. १९९४ पासून या रुपांतरणास सुरुवात झाली आणि आज धारावीच्या जवळ आपल्याला हे झाडांच्या दाटीवाटीने बहरलेले उद्यान पाहायला मिळते.

निसर्गाचे संवर्धन, शिक्षण आणि त्या विषयीची जनजागृती हे हेतू डोळ्यांपुढे ठेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (मुंमप्रविप्रा) ने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली आहे. हे निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ह्या मानवनिर्मित जंगलालाच जोडून माहीमच्या खाडीतील म्हणजेच मिठी नदीच्या पात्रातील तिवरांची नैसर्गिक जंगले आहेत. नैसर्गिक संपदेचा वारसा टिकवून ठेवणे आणि त्यांचे संवर्धन करणे या दुहेरी हेतूने साकारलेल्या या निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईसारख्या गच्च दाटीवाटीच्या शहराच्या मध्यभागी आहोत ह्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो.

या उद्यानात विविध पक्षी, कीटक, फुलपाखरे, औषधी झाडे, दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. या उद्यानाची सैर करण्यासाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात निसर्ग फेरी निघते. त्यात सहभागी झाल्यास संपूर्ण उद्यानाचा परिसर तज्ज्ञ अभ्यासकाच्या मार्गदर्शनासह तुम्हांला पाहता येतो. या उद्यानात निसर्गाच्या संबंधित काम करणाऱ्या संस्थांद्वारे छायाचित्रण शिबिरे, चित्रकला कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते. कोणत्याही ऋतूत या उद्यानाला आपण भेट देऊ शकतो.

या उद्यानाला जाण्यासाठी सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे सायन. सायन रेल्वे स्टेशनपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर हे उद्यान वसले आहे. त्याचप्रमाणे येथे जाण्यासाठी धारावी डेपोमध्ये येणाऱ्या कोणत्याही बसचा पर्याय तुम्ही निवडू शकतात. खाजगी वाहनानेही हे उद्यान तुम्ही गाठू शकतात.







18,522