
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून, थंडी कमी झाली आहे. याचबरोबर, बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा सुमारे तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कमाल तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे.
मुंबईत किमान तापमान बावीस ते पंचवीस सेल्सिअसच्या दरम्यान आहे, तर कमाल तापमान तेहत्तीस ते पस्तीस सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले असून दिवसा उष्णता जाणवत आहे. ही तापमानवाढ प्रामुख्याने अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे झाली आहे. अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त आणि उष्ण वाऱ्यांचा प्रवाह राज्याकडे येत आहे. या वाऱ्यांमुळे जमिनीजवळील हवामान उष्ण आणि दमट बनत आहे, ज्यामुळे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस उष्णता जाणवत आहे. हिवाळ्यात उत्तर-पश्चिमेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राकडे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे किंवा त्यांचा मार्ग बदलला आहे. थंडीसाठी हे वारे आवश्यक असतात. या अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे सर्दी, खोकला सारखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे आणि नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
यासोबतच बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात लवकरच एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून दूर असल्याने, त्याचा थेट मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र, चक्रीवादळामुळे राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि किमान तापमानात थोडी घट जाणवू शकते. महाराष्ट्रापासून चक्रीवादळ दूर असले तरी, याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील आर्द्रता वाढू शकते. परिणामी, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान निर्माण होऊन हलक्या सरी पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या बदलत्या हवामानामुळे काही भागांत अवकाळी पावसाचा धोकाही संभवतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी.
बंगालच्या उपसागरातील हवामानाची स्थिती आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांची दिशा बदलल्यावर राज्यात पुन्हा थंडीचे पुनरागमन होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्यानंतर थंडी पुन्हा जोरदार परतेल असा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.