कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत वाहतुकीत मोठे बदल
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या आणि कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बुधवार, बारा नोव्हेंबरपासून ते वीस नोव्हेंबरपर्यंत हा वाहतूक बदल लागू राहणार आहे. आळंदी येथे १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, १७ नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा संजीवन समाधी सोहळा आहे. या मुख्य सोहळ्यांसाठी दहा ते पंधरा लाख भाविक आळंदी आणि देहू परिसरात दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे.
यात्रेदरम्यान, भाविक मोठ्या संख्येने आळंदीहून देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर व भंडारा डोंगराकडे दर्शनासाठी जात असतात. या प्रचंड गर्दीमुळे आळंदी आणि देहूगाव येथे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन, पोलिसांनी आळंदी शहरात अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
आळंदीकडे येणाऱ्या आणि आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या काही मुख्य मार्गांवर वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. पुणे-आळंदी रस्ता, मोशी-आळंदी रस्ता, चिंबळी-आळंदी रस्ता, चाकण-आळंदी रस्ता, वडगाव घेणंद मार्गे-आळंदी रस्ता, मरकळ-आळंदी रस्ता या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.
आळंदी आणि देहूगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना अनेक मुख्य चौकांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यात मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, चाकण, आळंदी फाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा, मरकळ मार्ग, पुणे दिघी-मॅगझीन चौक, देहूगाव कमान, कॅनबे चौक आणि तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहू फाटा यांचा समावेश आहे. या मार्गावरील अवजड वाहनांनी वाहतुकीसाठी जयगणेश साम्राज्य, अलंकापुरम चौक, चोविसावाडी, विश्रांतीवाडी, भोसरी, मोशी-चाकण, भोसरी चौक, कोयाळी कमान, धानोरी फाटा, भोसरी मार्गे, चऱ्होली फाटा, भक्ती-शक्ती चौक या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.
आळंदीत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पोलिसांनी शहराबाहेर अनेक ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. तळेकर पाटील चौकाजवळ दक्षिण व उत्तर बाजू, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानविलास महाविद्यालय परिसर, मुंगसे वाहनतळ, चाकण रस्त्यावरील इंद्रायणी रुग्णालयासमोरील जागा, विश्रांतवाडी-वडगाव रोड, आळंदी नगर परिषद शौचालयाजवळील वाहनतळ या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन एसटी आणि पीएमपीएमएल बसच्या थांब्यांमध्येही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. आळंदी येथून सर्व ठिकाणी जाणाऱ्या बस योगिराज चौकातून सुटणार आहेत. देहूगावकडे जाणाऱ्या बस डुडुळगाव येथील जकातनाका येथे थांबतील. पुण्याकडे जाणाऱ्या बस या चऱ्होली फाटा येथे थांबतील. वाघोली, शिक्रापूरकडे जाणाऱ्या बस धानोरे फाटा चौक येथे थांबतील. चाकणकडे जाणाऱ्या बस या इंद्रायणी रुग्णालय येथे थांबतील. अहिल्यानगरकडे जाणाऱ्या बस या विश्रांतवाडी फाटा चौकात थांबतील.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भाविक आणि नागरिकांना या बदललेल्या वाहतूक नियमांनुसार प्रवास करण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.