पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे वाहतुकीत मोठे बदल
पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा थरार १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. या जागतिक स्तरावरील इव्हेंटमुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार, १९ जानेवारी रोजी शहरातील प्रमुख आठ भागांतील शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.
या स्पर्धेची सुरुवात प्रोलॉग रेसने होणार आहे. ही शर्यत पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. ज्या रस्त्यांवरून शालेय बस आणि विद्यार्थ्यांची वाहने धावतात, त्याच मार्गांवरून आंतरराष्ट्रीय सायकलपटू ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने सायकली चालवणार आहेत. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये आणि वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, खालील क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १९ जानेवारी रोजी बंद राहतील. शिवाजीनगर – घोले रोड, विश्रामबाग वाडा – कसबा पेठ, ढोले पाटील रोड व भवानी पेठ, औंध – बाणेर, कोथरुड – बावधन, सिंहगड रोड, वारजे – कर्वेनगर या परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद राहतील. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुख्य रस्ते तब्बल नऊ तास सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, गणेशखिंड रस्ता आणि या मार्गांना जोडणारे सर्व छोटे रस्ते बंद राहतील. स्पर्धेचा मार्ग हा खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, रेंज हिल्स, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, बालगंधर्व चौक, डेक्कन जिमखाना हा असेल. या संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पुणेकरांना या जागतिक दर्जाच्या स्पर्धेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना या मार्गावर प्रवेश मिळणार नाही. नागरिकांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळावे किंवा प्रवासासाठी पुणे मेट्रोचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. खासगी कार्यालयांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुणे ग्रँड चॅलेंज स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ मध्ये रंगणार असून यामध्ये पस्तीसहून अधिक देशांतील एकशे एक्काहत्तर आंतरराष्ट्रीय सायकलपटू यामध्ये सहभागी होणा आहे. ही स्पर्धा जागतिक सायकलिंग कॅलेंडरमधील सर्वात मोठ्या शर्यतींपैकी एक मानली जात आहे. पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे एका दिवसासाठी जनजीवन विस्कळीत होणार असले, तरी जागतिक स्तरावर पुण्याची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रशासनाने हे नियोजन केले आहे. २० जानेवारीपासून सर्व शैक्षणिक संस्था आणि वाहतूक पूर्ववत सुरू होईल.