मल्हारगड (सोनोरी)

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.

‘मल्हारगड’ हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा – पाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्‍याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, श्री लक्ष्मी – नारायणाचे मंदिर, श्री मुरलीधराचे मंदिर ही पाहण्यासारखी मंदिरे आहेत. ही सर्व ठिकाणे मुंबई – पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.

मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने २ वाटांनी जाता येते. सासवड आणि झेंडे वाडीतून असे दोन मार्ग आहेत. सासवडपासून ६ किमी वर ‘सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला एसटीने जाण्याची सोय आहे. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते.

पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाट संपल्यावर ‘झेंडेवाडी’ गावाचा फाटा लागतो. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्‍या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावरच मल्हारगडाचे आपल्याला होते. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.
गडावर राहण्याची, जेवणाची, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथे मुक्कामास राहू नये.







11,321