
डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सह्याद्री, सातपुडा, अजिंठा-सातमाळा अशा पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत, जे शेकडो वर्षे होऊनही इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस व औरंगाबाद जिल्ह्यास लागून असलेल्या अजिंठा-सातमाळा रांगेत ‘मणिकपूंज’ एक लहानसा प्राचीन किल्ला आहे. या गडावर देवीची मूर्ती असलेले लेणे पहायला मिळते. हे लेणे कातळात खोदलेले आहे. आत देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली दिसते. लेण्याच्या वरच्या टप्प्यावर एक पाणी नसलेले टाके आहे.
त्याच्याही वर माथ्यावर चढून गेल्यावर आणखी एक सुकलेले टाके व पीर दिसतो. किल्ल्यावर एवढ्याच गोष्टी शिल्लक राहिल्या असून याव्यतिरिक्त कुठलेही अवशेष नाहीत. किल्याचावर पिण्याच्या पाण्याची अथवा खाण्याची कोणतीही सोय नाही. येथे जाण्यासाठी मनमाड – भुसावळ रेल्वेने जाऊन नांदगाव स्थानकात उतरावे. त्यानंतर नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील कासारबारी या गावात जावे. ‘मणिकपुंज’ला जाण्यासाठी या गावातून रस्ता आहे. येथून गडावर जाण्यास अर्ध्या तासाचा वेळ लागतो.