मांजरसुभा किल्ला

अहमदनगर जिल्ह्यात ‘मांजरसुंभा’ हा किल्ला आहे. पुण्याहून हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. ‘वांबोरी’ घाटातील पायथ्याशी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण सुरु झाल्यावर ‘मांजरसुभा’ गाव मिळते. ‘मांजरसुभा’ गावातून डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनीमारुतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आसपास गडाच्या खालच्या तटबंदीचे काही अवशेष सापडतात. काही काळापूर्वी इथे चुन्याचा घाना देखील बघायला मिळत होता; परंतु आत्ता तो सध्या तिथे नाही.

गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी वाट चांगली केली आहे. १५ मिनिटामध्ये गडावर सहज पोहोचता येते. गडाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेर २ देवड्या आहेत. आत प्रवेश केल्यावर २ भव्य दालने आहेत. या दालनांना प्रकाश येण्यासाठी झरोके आहेत. आत गेल्यावर जिना मिळतो. या जिन्याने प्रवेशद्वारावर जाऊन परिसर न्याहाळू शकता.

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर गडावर प्रवेश करतो. समोरच एक तुटलेल्या अवस्थेतील इमारत बघायला मिळते. या इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. या टाकीची खोली जवळपास ५ ते ६ फुट आहे. राणी महालाच्या भिंतीच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत. एका दालनात दर्गा आहे. या दर्ग्याच्या समोर हौदांची रचना असून त्यात तांब्याच्या पाईपलाईन दिसतात. तिथून थोडे पुढे गेल्यावर बुरुज दिसतो. दुमजली इमारत इथे बघायला मिळते. दुमजली इमारतीपासून पूर्वेला गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात.






297 वेळा पाहिलं