
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व संलग्न संस्थांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची वार्षिक सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाली. या वेळी अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, महासंघाचे संचालक, अधिकारी तसेच संलग्न संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अध्यक्ष पानसरे म्हणाले की, पीक खरेदी प्रक्रियेसंदर्भात महासंघामार्फत नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महासंघाची नवी गोदामे उभारणे, मालमत्तेचे संरक्षण व वाढ करणे, संकेतस्थळाचा वापर अधिक सुलभ करणे या दिशेने प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी नमूद केले. यावर्षी ‘सहकार वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले असल्याने अधिकाधिक सहकारी संस्थांना खरेदीची कामे देण्याबाबत राज्य शासनाला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील यांनी महासंघाच्या वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर आढावा मांडला. देशभरात सर्वाधिक म्हणजे दोन हजार दोनशे दोन कोटी रुपयांची सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात झाली असून याचा थेट लाभ दोन लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना मिळाला, अशी माहिती त्यांनी दिली. महासंघाकडे राज्यभरात एकशे अठ्ठावीस ठिकाणी मालमत्ता असून त्यांची क्षमता दोन लाख ऐंशी हजार मेट्रिक टन असल्याचे त्यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षात महासंघाने एकशे एक कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकावन्न लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
सभेच्या शेवटी, मागील वर्षात राज्य शासन विभागांतर्गत तसेच नाफेड खरेदी विभागांतर्गत उत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्था, रासायनिक व भगीरथ खत विभागातील सर्वोत्कृष्ट संस्था तसेच सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महासंघाची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले.