माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु होणार – पर्यटकांना दिलासा
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माथेराच्या मिनी ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून गुरुवारपासून नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑक्टोबर दरम्यान ही मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येते. पावसाळा संपल्याने ती पुन्हा सुरू होत आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान या टप्प्यात शटल सेवा धावत आहेत.
मिनी ट्रेनला तीन द्वितीय, एक पारदर्शी, प्रथम आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामानवाहू असे सहा डबे असणार आहेत. सोमवार ते शुक्रवारदरम्यान अमन लॉज ते नेरळदरम्यान रोज सहा फेऱ्या धावतात. शनिवारी आणि रविवारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन फेऱ्या वाढवून एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतात. नव्या वेळापत्रकानुसार, नेरळ ते माथेरान या मार्गावर सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी आणि दहा वाजून पंचवीस मिनिटांनी या वेळांना गाड्या सुटतील. माथेरानहून नेरळकडे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि चार वाजता गाड्या धावतील.
माथेरानमध्ये पुन्हा एकदा हिल क्वीन म्हणून ओळखली जाणारी ही मिनी ट्रेन धावणार असल्यामुळे, पर्यटकांना डोंगराळ परिसरातील हिरवाई, वळणदार घाट, आणि निसर्गरम्य दृश्यांचा जवळून आनंद घेता येईल.