तांत्रिक कामांसाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
रेल्वे प्रशासनाकडून लोकलने प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. उद्या रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे जर उद्या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर रेल्वेचं वेळापत्रक आधीच तपासून घेणे गरजेचं आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागामार्फत अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागात हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ज्यामुळे प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड जाणाऱ्या काही जलद लोकल गाड्या माटुंगाजवळ वळविल्या जातील आणि ठरलेल्या ठिकाणी थांबतील. प्रवाशांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार प्रवासाची योजना आखणे आवश्यक आहे.
हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी आणि पणवेल या विभागात सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या वेळेत ब्लॉक लागू राहणार आहे. या काळात सीएसएमटी ते वाशी आणि पणवेलकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन गाड्या रद्द राहतील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे–वाशी आणि नेरुळ दरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील ज्यामुळे प्रवासात होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक पुन्हा तपासण्याचे, स्टेशनवर वेळेपूर्वी पोहोचण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे संकेतस्थळ किंवा अधिकृत समाज माध्यमाच्या वाहिनी तपासून अद्ययावत माहिती घेणे गरजेचे आहे.
या मेगा ब्लॉकमुळे रविवारी हजारो प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, रेल्वेच्या देखभाल आणि सुरक्षा कामांसाठी हा ब्लॉक अत्यावश्यक असल्याचे प्रशासन स्पष्ट करते. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाच्या सूचना पाळून प्रवास करावा असे प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे.