म्हाळसाकोरे मंदिरे


नाशिकमधील ‘म्हाळसाकोरे’ गाव मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील हेमाडपंती मंदिरे दुर्मिळ आहेत. ‘म्हाळसाकोरे’ला जायचे झाल्यास नाशिकहून सायखेडामार्गे जाता येते. हे अंतर साधारण ३०-३५ किलोमीटर आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून हे अंतर अवघे ४-५ किलोमीटर आहे. गावात गेल्यावर डाव्या बाजूला ‘म्हाळसा’ देवीचे मंदिर लागते.
‘म्हाळसाकोरे’ निफाड तालुक्यात आहे. ही या गावची मुख्य देवता असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ पहायला मिळते. ‘म्हाळसाकोरे’ या गावाच्या नावामागे 2 देवतांच्या संगमाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. म्हाळसाकोरे गावात एका हद्दीवर ‘म्हाळसादेवी’चे मंदिर आहे. दुसऱ्या हद्दीवर ‘साकरा’ देवीचे मंदिर आहे. एकाच गावातील 2 देवीच्या नावावरून गावाचे नाव पडणे, हे वेगळेपण ‘म्हाळसाकोरे’ गावात पहायला मिळते.
जेजुरीचे कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या 2 पत्नींपैकी म्हाळसादेवी यांचे माहेर चंदनपुरी तर आजोळ म्हणजे मामाचे गाव म्हाळसाकोरे होय. असे म्हंटले जाते की गावात ‘म्हाळसा’ नावाचा उपद्रवी राक्षस प्रजेला त्रास द्यायचा. त्याचा वध करून प्रजेला सुखी करणाऱ्या गावच्या कन्येला ‘म्हाळसादेवी’ म्हटले जाऊ लागले. मंदिरात म्हाळसादेवीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या हाताला गणपतीची तर डाव्या हाताला सरस्वतीची मूर्ती आहे.
म्हाळसादेवी मंदिराच्या शेजारी पुरातन दगडी विहीर असून देवी तेथे स्नान करत असे, अशी आख्यायिका सांगितली जाते. या विहिरीची सध्या दुरवस्था झाली आहे; मात्र त्याचे संवर्धन करून ती सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तेथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.
म्हाळसादेवी ही विशेषत: ब्राह्मण, सोनार समाजाची कुलदेवी असल्याने महाराष्ट्र तसेच गुजरातकडून येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. म्हाळसादेवीच्या मंदिराशेजारी श्री संत जनार्दन स्वामी महाराजांचा मठ पाहता येतो. चैत्र पौर्णिमेला देवीच्या यात्रेबरोबर हनुमान जयंती, खंडेराव महाराजांची यात्रा भरते. यावेळी बारागाड्या ओळणे, टांगा शर्यत, कुस्त्यांची दंगल, कलगीतुऱ्यांचा कार्यक्रम असतो. नवरात्रीत हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम गावचे वातावरण भक्तीमय करतात.
गावाच्या पूर्वेस बाराव्या शतकातील हेमाडपंती नीळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. म्हाळसाकोरे येथे पुरातन हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणेस नव्यानेच बांधण्यात आलेले श्रीहरी दत्ताचे मंदिर आहे. मंदिरासमोर आसनस्थ नंदीची दगडी मूर्ती आहे. मंदिराचे काम अतिशय सुंदर पाषाण शिल्पातील आहे. या परिसरात श्रीकृष्ण मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात इतर लहान मोठी शिल्पे पाहायला मिळतात. पडझड झालेल्या नीळकंठेश्वर महादेव मंदिराचे नंतरच्या काळात दुरूस्तीचे काम करण्यात आल्याने मंदिराचा खालचा भाग पुरातन तर वरचा भाग आधुनिक दिसतो.
दुरूस्ती करताना मंदिराच्या आतील शिल्पांना सुरक्षित ठेवल्याने त्याचे सौंदर्य मनमोहक ठरते. मंदिरातील मूर्ती वेरूळ, अजिंठ्याच्या लेण्यांतील शिल्पकलेची आठवण करून देतात. नीळकंठेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार सुंदर नक्षीने सजलेले आहे. मांजरगाव रस्त्याला ‘साकरा’ देवीचे मंदिर आहे. हे गाव आणि येथील मंदिरे फार रमणीय आहेत. त्यामुळे येथे भाविकांची गर्दीही असते.