आरसे निर्मिती

घरापासून कार्यालयापर्यंत, गाडीपासून कंपनीपर्यंत आरसा ही सर्वत्र वापरण्यात येणारी अत्यावश्यक गोष्ट आहे. सकाळी ताजेतवाने होऊन कामास लागण्यापूर्वी एकदा तरी स्वतःची प्रतिमा व्यक्ती आरशात पाहते.
जगात अशी एखादी व्यक्ती असेल, ज्याने स्वतःला कधी आरशात पाहिले नाही. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या घरात आरसा असतो. आज औद्योगिक उद्योगांमध्ये आरशांना मोठी मागणी आहे. आपल्या घरात आरशाचा वापर फक्त आपले प्रतिबिंब पाहण्यासाठी केला जातो; पण घरातून बाहेर पडल्यावर सगळीकडे आपल्याला आरसे दिसतात. वाहन चालवताना अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनाला आरसा असणे आवश्यक आहे, असा नियम आहे. मग ती मोटारसायकल असो, कार असो, रिक्षा असो, ट्रॅक्टर असो, ट्रक असो ! कोणत्याही प्रकारचे वाहन असो, त्यात आरसे असलेच पाहिजेत, आणि ते नेहमीच असतात; कारण वाहनधारकांची ती गरज असते.
अनेक कंपन्या, बँका, कार्यालये यांचे आत-बाहेरचे दरवाजे आरशांनी बनवलेले असतात. मोठमोठ्या बहुमजली इमारतींचे बाह्यभाग भिंतींऐवजी आरशासारख्या काचेने बनवलेले असतात. इमारतीच्या खिडक्यांना आरसे असतात. मोठमोठ्या इमारती, कॉर्पोरेट कार्यालये, बँकांच्या कार्यालयीन इमारती, सिनेमागृहाच्या बाजू पाहण्यासाठी ग्लास बसवणे आजकाल फॅशनेबल मानले जाते. हेअरड्रेसिंग सलून, पुरुष पार्लर आणि महिला ब्युटी पार्लरमध्ये मोठे आरसे असतात.
आरशाशिवाय त्यांचा व्यवसाय होऊ शकत नाही. अनेक स्त्रिया आणि पुरुष केशभूषाकारांची दुकाने पूर्णपणे आरशांनी सजलेली असतात. हॉटेल, गिफ्ट हाऊस, क्लब, शोरूम, कपड्यांची दुकाने, त्यांचे प्रवेशद्वार आरशांनी बनवलेले आहेत. त्यामुळे आरसा उद्योगाला मोठे महत्त्व आलेले आहे. आरसा बनवीत असताना काचेवर पाराचा लेप देणे ही आरसा बनवण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. काचेचा पृष्ठभाग स्वच्छ करून त्यावर पारा लावला जातो. असे ग्लास रासायनिक पदार्थांनी स्वच्छ केले जातात.
चांदीचा लेप दिल्यानंतर त्यावर तांब्याचा लेप दिला जातो. पाऱ्याचा लेप जास्त लावला जातो. या प्रक्रियेत काचेतील दोष दूर केले जातात. म्हणून लेप लावताना पाणी देखील काही वेळा शिंपडले जाते. काचेला सेल्युलोज इनॅमल रंग लावून संरक्षित केले जाते. काचेवर नक्षीकाम आवश्यक असल्यास काचेच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान काचेवर नक्षीदार रचना केली जाते.
काचेपासून आरसे बनवणे हा इतका मोठा प्रकल्प आहे, की काचेवर प्रक्रिया करून आरसा कसा बनवायचा, हे फक्त पुस्तकात किंवा संकेतस्थळावर वाचून कळणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि अनुभवाची गरज आहे. असा अनुभव थेट आरसे उत्पादन कारखान्यात काम करून मिळवावा लागेल. आरसा उत्पादन उद्योग सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रात अनुभवी आणि कुशल मजुरांची नियुक्ती करावी लागेल.
वेगवेगळ्या दर्जाचे आणि डिझाइनचे आरसे तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून सूत्रे तयार करून घ्यावी लागतात. यासाठी असे तज्ज्ञ, कुशल आणि अनुभवी मजूर घ्यावे लागतील. आरसा ही अशी गोष्ट आहे जी कधी ना कधी तुटते. यासाठी आरसा तुटल्यास त्या ठिकाणी नवीन आरसा विकत घ्यावा लागतो. इमारतींच्या सजावटीसाठी आरशांचा वापर होत असल्याने त्या भागातूनही मागणी मिळवण्याचा प्रयत्न करा. घरगुती वापराचे आरसे दुकाने, गिफ्ट हाऊसमध्ये आढळतात. विक्रेत्यांना भेटा आणि त्यांना विक्रीसाठी तयार करा. या उद्योगासाठी उच्च दर्जाची काच, सेल्युलोज इनॅमल रंग, रसायने, शेंदूर, वेष्टनासाठी बॉक्स, भुसा इ., काच साफ करणारे यंत्र, एअर कॉम्प्रेसर फिल्टर, पाण्याची मोठी टाकी, वर्कचार्ट सेटअप अशी उत्पादन सामग्री आवश्यक आहे.