राज्यात दीड कोटीहून अधिक नागरिकांची मधुमेह तपासणी – लाखो रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात मधुमेहविरोधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. 1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यातील तब्बल एक कोटी पन्नास लाख एकोणऐंशी हजार आठशे बावन्न नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली. यापैकी अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार सातशे नऊ नागरिकांवर सध्या विविध शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये मधुमेहाची तपासणी आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत.

14 नोव्हेंबर रोजी राज्यभर जागतिक मधुमेह दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला असून यावर्षीच्या कार्यक्रमाचा उद्देश सर्व वयोगटांमध्ये मधुमेहासंबंधी जागरूकता वाढविणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाचे घोषवाक्य “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह” असे जाहीर केले असून, बाल्यावस्था ते वृद्धत्वपर्यंत प्रतिबंध, तपासणी आणि उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

या निमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेह हा सर्व वयोगटांमध्ये पसरत असून त्यासाठी आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण आणि वेळोवेळी तपासणी आवश्यक आहे. बालक, गरोदर स्त्रिया, कार्यक्षम प्रौढ आणि वृद्ध—या सर्व गटांवर मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये आरोग्य शिबिरे, व्याख्याने, परिषदा आणि जनजागृती मोहीमा राबविण्यात येणार आहेत. नागरिकांना मधुमेहाच्या प्रारंभिक लक्षणांबाबत, प्रतिबंधक उपायांबाबत आणि योग्य उपचारांविषयी माहिती दिली जाईल. यामुळे आजाराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना आयुष्यभर आरोग्य जपण्याच्या दृष्टीने संतुलित आहार, सक्रिय जीवनशैली आणि नियमित तपासणीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजाच्या एकत्रित सहभागाची गरज असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.






13,693 वेळा पाहिलं